नवी दिल्ली - इंडिगो विमान कंपनीच्या दोन प्रवर्तकामधील वाद वाढत असताना इंटरग्लोबने संचालक मंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या संचालक मंडळामध्ये चार जण हे स्वतंत्र संचालक असणार आहेत. इंटरग्लोब एव्हिएशनकडे देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची मालकी आहे.
इंटरग्लोब एव्हिएशन कंपनीच्या संचालक मंडळाची २० जुलैला बैठक झाली. त्यामध्ये राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया या दोन प्रवर्तकामधील वादाचा विषय चर्चेत आला. सध्या या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये सहा सदस्य आहेत. त्यामध्ये दोन स्वतंत्र संचालकांचा समावेश आहे.
कंपनीला संचालक मंडळाचा विस्तार करण्यासाठी कंपनी कायद्यानुसार नियमात काही बदल करणार आहे. या बदलाला वार्षिक सर्वसाधारण बैठकीत समभागधारकांची (शेअरहोल्डर) मंजुरी घ्यावी लागणार आहे. यापूर्वी कंपनीने १९ जुलैला स्वंतत्र संचालक म्हणून महिलेची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
हे आहेत संचालक मंडळाचे सदस्य-
सेबीचे माजी अध्यक्ष एम.दामोदरन हे इंटरग्लोब एव्हिएशनचे चेअरमन आहेत. भाटिया यांची पत्नी रोहिणी भाटिया, जागतिक बँकेचे माजी कार्यकारी अधिकारी अनुपम खन्ना आणि सीए अनिल पराशर हे संचालक मंडळावर आहेत. राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया हे प्रवर्तकही संचालक मंडळावर आहेत. बाजार नियंत्रक सेबी आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून इंटरग्लोब एव्हिएशनच्या प्रशासनातील त्रुटीमधील पाहणी केली जात आहे.
काय आहे प्रवर्तकामधील वाद-
इंडिगोचे प्रवर्तक राकेश गंगवाल यांनी सहसंस्थापक राहुल भाटिया यांच्यावर टीका केली होती. गंगवाल यांनी अवाजवी मागण्या केल्याचे भाटिया यांनी म्हटले होते. जवळपास वर्षभर वाद सुरू राहिल्यानंतर सेबीने ह्स्तक्षेप करावा, अशी गंगवाल यांनी नुकतेच मागणी केली आहे. कंपनी मुलभूत तत्वापासून वळत असल्याचाही त्यांनी दावा केला.