नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला वाचविण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बिल थकल्याने बीएसएनएल व एमटीएनएलच्या वीज जोडणी तोडू नये, अशा सूचना केंद्रीय दूरसंचार विभागाने राज्य सरकारांना दिल्या आहेत. निवडणुकीच्या मशिनसाठी बीएसएनलकडून दूरसंचार सेवा दिली जात आहे.
तीव्र स्पर्धेमुळे बीएसएनएल हे आर्थिक संकटात असल्याचे केंद्रीय दूरसंचार विभागाचे मुख्य सचिवांनी राज्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे थकित बील भरण्यासाठी वेळ लागत असल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले.
काय म्हटले आहे पत्रात-
बीएसएनएलला आर्थिक मदत करण्याचा विषय दूरसंचार विभाग स्वतंत्रपणे हाताळणार आहे. बीएसएनएलची वीज जोडणी राज्य वीज मंडळाने तोडल्यास निवडणुकीदरम्यान दूरसंचार सेवेत अडथळा येईल, असे दूरसंचार विभागाने म्हटले. तसेच इतर सरकारी संस्थांना मिळणाऱ्या दूरसंचार सेवेवर परिणाम होईल, अशी भीती दूरसंचार विभागाने व्यक्त केली आहे.
बीएसएनएल आणि एमटीएनएलकडून निवडणुकीच्या मशिनसाठी दूरसंचार सेवा देण्यात येते. ही परिस्थिती लक्षात घेता वीज जोडणी तोडू नयेत, अशा सूचना राज्य सरकारांनी राज्य विद्युत मंडळांना द्याव्यात असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. नुकताच दूरसंचार विभागाने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांची फेब्रुवारीमधी थकित पगार देण्यासाठी मदत केली होती. एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीमधील वेतन देण्यासाठी १७१ कोटींची आर्थिक मदत केली आहे.