बंगळुरू - अॅक्सेंच्युअर कंपनीने कर्मचारी कपात करण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनाला कर्नाटक राज्य आयटी कर्मचारी संघटनेने (केआयटीयू) तीव्र विरोध केला आहे. कर्मचारी कपात करणे हे बेकायदेशीर असल्याचे केआयटीयूने म्हटले आहे.
अॅक्सेंच्युअर कंपनी जगभरातील एकूण मनुष्यबळापैकी ५ टक्के मनुष्यबळ कमी अथवा २५ हजार कर्मचारी कमी करणार आहे. भारतात अॅक्सेंच्युअर कंपनीचे जगात सर्वाधिक २ लाखांहून अधिक कर्मचारी आहे. देशातील किमान १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे.
कामगार कायद्यानुसार १०० कर्मचाऱ्यांहून अधिक मनुष्यबळ असलेल्या कंपन्यांना कर्मचारी कपात करताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. यामध्ये बदल करून कर्नाटक सरकारने ३०० कर्मचाऱ्यांहून अधिक मनुष्यबळ असलेल्या कंपन्यांनी नियम लागू केला आहे. त्यामुळे कंपनीला कर्मचारी कपात करण्यापूर्वी कर्नाटक सरकारची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे केआयटीयूने म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला सांगणे अथवा स्वेच्छानिवृत्ती घ्यायला भाग पाडणे हेदेखील कायदाविरोधात आहेत. कंपनीने राजीनामा मागितला तर देवू नये, अशी केआयटीयूचे महासचिव उल्लास सी यांनी विनंती केली आहे. स्थानिक कायद्याचा आदर करा, अशी संघटनेने अॅक्सेंच्युअर कंपनीच्या व्यवस्थापनाला विनंती केली आहे. तसेच कर्नाटक सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करा, अशी कर्मचारी संघटनेने मागणी केली आहे.