दावोस - आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब दावा केला आहे. अमेरिका हा विकसनशील देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) अमेरिकेला योग्य वागणूक देत नसल्याचा त्यांनी आरोपही केला. ते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, डब्ल्यूटीओ ही अमेरिकेचा विकसनशील म्हणून विचार करत नाही. दुसरीकडे डब्ल्यूटीओ ही चीन आणि भारताचा विकसनशील म्हणून विचार करते. पुढे ते म्हणाले, डब्ल्यूटीओबाबत माझे काही मतभेद असल्याचे तुम्हाला माहीत आहे. कारण अमेरिकेला योग्य वागणूक दिली जात नाही, असे ट्रम्प म्हणाले.
हेही वाचा-ग्राहकांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर आणखी उतरले
भारत-चीनला विकसनशील देश म्हणून प्रचंड फायदे मिळतात. तसे फायदे आम्हाला मिळत नाही. त्यांनाही फायदे मिळू नयेत. जर त्यांना फायदे मिळत असतील, तर आम्हालाही फायदे मिळावेत. आम्ही संपूर्ण नवीन कराराबाबत बोलत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून डब्ल्यूटीओ अमेरिकेला योग्य वागणूक देत नाही.
हेही वाचा-एजीआर शुल्क भरण्याची आज शेवटची मुदत; एअरटेलने 'ही' घेतली भूमिका
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना ट्रम्प सरकारने ७० लाख नवे रोजगार निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पन्नास वर्षात अमेरिकेत बेरोजगारीचे सर्वात कमी प्रमाण झाल्याचाही त्यांनी दावा केला.