नवी दिल्ली - चीनबरोबर व्यापारी युद्ध सुरू असलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारताबरोबर व्यापारी तणावात आणखी भर टाकली आहे. दोन्ही देशात व्यापारी मुद्द्यावरून मार्ग निघत नाही. अशा स्थितीत अनुचित व्यापार पद्धतीवरून आणखी कार्यवाही करायला भाग पाडू नका, असा इशारा अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिथीझर यांनी दिला. ते अमेरिकेच्या संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारातील प्राधान्यक्रमातून भारताला वगळण्याचा ५ जूनला निर्णय घेतला होता. याबाबत अमेरिकेच्या संसदेत रॉबर्ट लिथीझर यांनी ट्रम्प सरकारची भारताबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की अमेरिकेन काँग्रेसच्या आकडेवारीनुसार व्यापार प्राधान्यक्रमातील व्यवस्थेत (जीपीएस) सर्वात अधिक भारताला फायदा मिळाला आहे. भारतामधून अमेरिकेत निर्यात करणाऱ्या ५.७ अब्ज डॉलर मुल्याच्या वस्तुंवरील आयात शुल्क जीएसपीनुसार २०१७ मध्ये माफ करण्यात आले होते.
पुढे ते म्हणाले की, आम्ही भारताविषयी चिंता करत खूप वेळ घालविला आहे. त्यांच्यासोबत अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न गेल्या काही महिन्यांत उपस्थित केले असल्याचे रॉबर्ट यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिने ट्रम्प प्रशासनाने जीएसपीचा आढावा घेतला. त्यानंतर जीएसपी काढून टाकण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. गेली अनेक महिने भारताबरोबरील समस्यांबाबत कोणताही मार्ग निघत नाही, असेही ते म्हणाले.
भारताकडून विविध अनुचित व्यापारी पद्धती होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. त्यामुळे आणखी कार्यवाही करावी लागेल, असे ते म्हणाले. याबाबत रिपब्लिकन पक्षाचे नेते जॉर्ज होल्डिंग यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मार्ग निघण्याबाबत ट्रम्प प्रशासन आशावादी-
त्यांच्याकडे (भारत) आता नवे सरकार आहे. अर्थात, तेच नेते, मात्र नवे सरकार आहे. त्यांना येत्या काही दिवसांत बोलणार आहे. मला आशा आहे पुन्हा नवी सुरुवात होईल आणि नवा मार्ग निघेल. भारतामध्ये सर्वात अधिक आयात शुल्क आहे, असा रॉबर्ट यांनी यावेळी दावा केला. त्यांची अर्थव्यवस्था खूप प्रतिष्ठित आहे. ती खूप नियंत्रित आहे. त्यांनी डिजीटल, कृषी आणि उत्पादन क्षेत्रात काही समस्या निर्माण केल्या आहेत. तसेच किरकोळ क्षेत्रातील समस्या निर्माण केल्या आहेत.
दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ हे २५ ते २७ जूनदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत.