नवी दिल्ली - भारतीय कंपन्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून आयात करत असल्याची बाब समोर आली आहे. या आयातीला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण बुलेटप्रुफ जॅकेटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा उत्पादन प्रकल्प देशात सुरू करण्यासाठी विदेशातील चार ते पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. याबाबतची माहिती नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.सारस्वत यांनी दिली.
व्ही.के.सारस्वत हे डीआरडीओचे माजी अध्यक्ष आहेत. ते म्हणाले, भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी विदेशातील कंपनीबरोबर भागीदारी करार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या कंपन्यांचे नाव आताच जाहीर करणे, घाईचे ठरेल असे त्यांनी म्हटले. नवे बुलेटप्रुफ जॅकेट हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँण्डर्सच्या निकषानुसार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कमी वजनाचे बुलेटप्रुफ जॅकेट तयार करण्यासाठी देशातील उद्योगांना सवलत मिळावी, यासाठी रोडमॅप तयारी करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोगाला केली आहे.
यापूर्वी काय म्हणाले होते व्ही.के.सारस्वत ?
चिनी कच्च्या मालापासून तयार करण्यात आल्याने बुलेटप्रुफ जॅकेटच्या दर्जावर परिणाम होणार नसल्याचे यापूर्वी नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.सारस्वत यांनी म्हटले होते. चीनी कच्च्या मालापासून तयार झालेली बुलेटप्रुफ जॅकेट निकृष्ट असल्यासच आपण हस्तक्षेप करू शकतो, असे सारस्वत यांनी म्हटले होते. हे विधान त्यांनी चालू महिन्यातील आठवड्याच्या प्रारंभी केले होते.
सैन्यदलाला ३ लाखांहून अधिक बुलेटप्रुफ जॅकेटची आवश्यकता -
सरकारच्या अंदाजानुसार सैन्यदलाला ३ लाखांहून अधिक बुलेटप्रुफ जॅकेटची आवश्यकता आहे. त्यानुसार सैन्यदलाने देशातील खासगी कंपन्यांना जॅकेट तयार करण्याची ऑर्डर काढली आहे. यापूर्वी देशातील कंपन्या युरोप आणि अमेरिकेकडून कच्च्या माल घेत होत्या. मात्र, आता बहुतांश कंपन्या स्वस्त दरामुळे चीनकडून कच्चा माल घेत आहेत.