नवी दिल्ली - कोरोनाच्या लसीबाबत दिलासादायक बातमी आहे. सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि आयसीएमआरने लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. या चाचणीसाठी देशातील १,६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. ही माहिती दोन्ही संस्थांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
सिरम आणि आयसीएमआर या दोन्ही संस्था संयुक्तपणे कोरोनावरील लसीच्या वैद्यकीय चाचण्या देशात घेणार आहेत. चाचणीचा खर्च सरकारी संस्था असलेली आयसीएमआर करत आहे. तर कोव्हिशिल्ड लसीवरील इतर खर्च हा सिरमकडून केला जात आहे. एसआयआय आणि आयसीएममारकडून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या देशातील १५ विविध केंद्रांवर घेण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या १,६०० स्वयंसेवकांची नोंदणी ३१ ऑक्टोबरला करण्यात आली आहे.
आयसीएमआरने महत्त्वाची भूमिका बजावली-पूनावाला
कोरोनाच्या लढ्यात पुढे येण्यासाठी व बळ देण्यासाठी आयसीएमआरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सिरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी म्हटले आहे. दोन्ही संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून देश हा प्रतिकारक्षम आमि प्रभावी लसीच्या निर्मितीत आघाडीवर जाण्यास मदत होणार आहे. कोरोना महामारीचा संसर्ग रोखताना खासगी आणि सरकारी संस्था एकत्रित येताना व्यवस्थापनाची चाचणीच होणार आहे.
यापूर्वीच सिरमने लसीचे ४० दशलक्ष डोस तयार केले आहेत. सिरमने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने पुण्यातील एसआयआय प्रयोगशाळेत कोव्हिशिल्ड ही कोरोनाची लस तयार केली आहे.