मुंबई - बँकिंग नियमांच्या पालनात त्रुटी असणे राज्यातील 2 सहकारी बँकांना चांगलेच महागात पडले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पुणे जनता सहकारी बँकेला २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर जळगाव पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला १ कोटींचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने पुणे जनता सहकारी बँकेला दंड ठोठावल्याचे आदेश १६ ऑक्टोबरला काढले आहेत. उत्पन्नाची माहिती आणि मालमत्तेची वर्गवारी (आयआरएसी) यांचे नियम पालन न केल्याने हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. अशाच पद्धतीने जळगाव पिपल्स को-ओपरेटिव्ह बँकेवरही कारवाई केल्याचे आरबीआयने आदेश काढले आहेत.
हेही वाचा-ऐन दिवाळीत पीएमसी ठेवीदारांची आरबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने
बँकिंग नियमन कायदा १९४९ नुसार आरबीआयला बँकांना दंड ठोठावण्याचा अधिकार आहे. नियमांचे पालन करताना त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचा बँकेच्या व्यवहारावर तसेच ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.