अहमदाबाद - पेप्सिको इंडियाने शुक्रवारी गुजरातमधील नऊपैकी उर्वरित २ शेतकऱ्यांवरील दावेही मागे घेतले आहेत. मात्र पेप्सीको कंपनीने माफी मागावी, अशी संतप्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पेप्सिकोकडे पेटंट असलेल्या बटाट्याची शेतकऱ्यांनी लागवड केल्याचा दावा करत कंपनीने गुजरामधील न्यायालयात दावे दाखल केले होते.
शेतकऱ्यांचे बाजू मांडणारे वकील आनंद याज्ञिक म्हणाले, शेतकऱ्यांवरील कोणतेही दावे आता प्रलंबित नाहीत.
गुजरातमधील ३ न्यायालयात ११ शेतकऱ्यांविरोधात होते दावे-
आठवडाभरापूर्वी पेप्सिकोने बनासकांठा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांविरोधातील दावे मागे घेतले आहेत. हे दावे दीसा व्यापारी न्यायालयातील दाखल करण्यात आले होते. साबरकंठामधील दोन आणि आरवल्लीमधील ५ शेतकऱ्यांविरोधातील दावेही पेप्सीकोने मागे घेतल्याचे याज्ञिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बनासकंठा, साबरकंठा आणि आरवल्ली जिल्ह्यातील एकूण ११ शेतकऱ्यांविरोधात पेप्सीको कंपनीने गुजरातमधील तीन न्यायालयात दावे ठोकले होते. दाव्यापोटी कंपनीने शेतकऱ्यांकडून २० लाख ते १ कोटी रुपयांची मागणी केली होती. विनाशर्त शेतकऱ्यांविरोधातील दावे मागे घेणार असल्याचे पेप्सीको कंपनीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही न्यायालयांनी पेप्सीको कंपनीची मागणी मान्य केली.
यामुळे पेप्सिकोने ठोकले शेतकऱ्यांविरोधात दावे-
बटाट्याचे एफसी-५ या वाणाचे अधिकार प्लांट व्हरायटी प्रोटेक्शननुसार (पीव्हीपी) पेप्सीकोकडे असल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र अशा अधिकारातून शेतकऱ्यांना सूट असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नोंदणीकृत वाणाचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात जाणे भाग पडल्याची पेप्सीको कंपनीने सारवासारव केली. पेप्सीको कंपनीने माफी मागावी, अशी पेप्सीकोकडून दावे ठोकण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. जर कंपनीने माफी मागितली नाही, तर त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे याज्ञिक यांनी सांगितले. भरपाई म्हणून १ रुपयाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.