नवी दिल्ली - रेल्वेतून प्रवास करताना थकलेल्या शरीराला मालिश करण्याची सुविधा मिळाली तर? रेल्वेनेही अशी सुविधा प्रवाशांना देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रवाशाला १०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
रेल्वेमंत्रालयाचे माध्यम संचालक राजेश दत्त बाजपाई म्हणाले, रतलाम विभागाने ३९ रेल्वेतून प्रवाशांना मालिश सेवा देण्याच्या सूचना ७ जूनला काढल्या आहेत. या सर्व रेल्वे इंदूर रेल्वे स्थानकामधून सुटतात. प्रवासी भाडे न वाढविता महसूल वाढविण्याच्या योजनेअंतर्गत (एनआयएनएफआरआयएस) ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
प्रत्येक रेल्वेत तीन ते पाच मसाज करणारे रेल्वे कर्मचारी असणार आहेत. त्यांना कंत्राटीपद्धतीने सेवेत घेण्यात येणार असल्याचे बाजपाई यांनी सांगितले. कंत्राटदार आणि मसाज करणाऱ्यांची पार्श्वभूमी पाहून त्यांना ओळखपत्र दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. मसाजच्या नवीन सेवेमुळे रेल्वेला वार्षिक २० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. तर तिकीट विक्रीतून रेल्वेला ९० लाखांहून अधिक वार्षिक महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या रेल्वेतून मिळणार मसाजची सुविधा -
मालला एक्सप्रेस, इंदूर-लिंगमपल्ली हमसफर एक्सप्रेस, अवंतिका एक्सप्रेस, इंदूर-वेरावल महामना एक्सप्रेस, शिप्रा एक्सप्रेस, नर्मदा एक्सप्रेस, अहिल्या नागरी एक्सप्रेस, पंचवल्ली एक्सप्रेस, इंदूर-पुणे एक्सप्रेस.