मुंबई - डायमंड व्यापारी मेहुल चोक्सी हा कोट्यवधी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आणि कर्जबुडवा आहे. असे ईडीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आरोग्याच्या कारणामुळे देशात परतू शकले नसल्याचा दावा चोक्सीने याचिकेत केला होता. यावर ईडीने चोक्सी देशात उपचार घेवू शकतो, असे म्हटले आहे.
आर्थिक कर्जबुडवा घोषित केले असताना हा निर्णय रद्द करावा, अशी चोक्सीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच ईडीकडून काही लोकांचे घेण्यात आलेल्या जबावाची विरुद्ध पडताळणी करण्याची परवानगी मागणारी याचिकादेखील चोक्सीने केली आहे. चोक्सीने मनी लाँड्रिंग करून पंजाब नॅशलन घोटाळ्यातील ६ हजार ९७ कोटी हस्तांतरीत केल्याचे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
काय म्हटले ईडीने प्रतिज्ञापत्रात -
चोक्सीला हजर राहण्यासाठी अनेकवेळा समन्स पाठविण्यात आले होते. विशेष न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट बजावूनही त्याने जाणीवपूर्वक तपास संस्थेसमोर येण्याचे टाळले. फौजदारी कारवाई टाळण्यासाठी चोक्सीने देश सोडल्याचे दिसत आहे. तसेच सातत्याने भारतात येण्यास नकार दिला आहे. चोक्सीने अँटिगा देशाचे नागरिकत्व स्विकारले आहे. यातून त्याला देशाला परत येण्याची व चौकशीप्रकरणी भारताला सहकार्य करण्याची इच्छा नसल्याचे दिसून येत आहे. आर्थिक कर्ज बुडविल्याप्रकरणी आरोपी न्यायालयात हजर राहिल्यास पुढील कार्यवाही करता येत असल्याचे ईडीने म्हटले आहे.
चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे १३ हजार ४०० कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ईडीसह सीबीआयला मेहुल आणि चोक्सी हे दोन्ही आरोपी हवे आहेत. चोक्सीच्या याचिकेवर उच्च न्यायालय मंगळवारी सुनावणी घेणार आहे.