नवी दिल्ली - देशभरातील बाजार मंगळवारी खुला राहिल, असे व्यापाऱ्यांची संघटना सीएआयटी आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनने जाहीर केले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (७ डिसेंबर) देशभरात 'भारत बंद'चे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कायद्यांविरोधात हजारो शेतकऱ्यांनी गेली ११ दिवस आंदोलन सुरू ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरील केंद्र सरकार व शेतकरी संघटनांमधील चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, सरकारने कायदे मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिले नसल्याने पंजाब, हरियाणासह इतर राज्यांमधील शेतकरी दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत.
हेही वाचा-'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस; दररोज वाढतोय शेतकऱ्यांना देशभरातून मिळणारा पाठिंबा..
'भारत बंद'मध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका सीएआयटी आणि ऑल इंडिया टान्सपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनने (एआयटीडब्ल्यूए) स्पष्ट केली आहे. कोणतीही शेतकरी संघटना अथवा शेतकरी नेत्याने प्रश्नाबाबत पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे व्यापारी आणि वाहतूकदार हे भारत बंदमध्ये सहभागी होत नसल्याचे दोन्ही संघनांनी संयुक्त निवदेनात म्हटले आहे.
हेही वाचा-उद्या 'भारत बंद'ची शेतकरी संघटनांची हाक; 'या' पक्षांनी दर्शवला पाठिंबा