नवी दिल्ली - प्राप्तिकराचे विवरणपत्र (आयटीआर) भरण्यास उशीर झालेल्या प्राप्तिकरदात्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी प्राप्तिकराचे विवरण पत्र भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विवरण भरण्याची शेवटची मुदत ३० सप्टेंबरवरून ३० नोव्हेंबर २०२० केली आहे. ही माहिती सीबीडीटीने ट्विट करून दिली आहे. कोरोना महामारीच्या संकटात प्राप्तिकरदात्यांना विवरणपत्र भरण्यासाठी खरोखर अडचणी येत आहेत. त्यामुळे मुदतवाढ दिल्याचे सीबीडीटीने ट्विटमध्ये म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ करता प्राप्तिकराचे विवरणपत्र भरण्यासाठी केंद्र सरकारने चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
हेही वाचा-'जगात सर्वाधिक वाईट पद्धतीने कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी भारताची अर्थव्यवस्था'
प्राप्तिकराचे विवरणपत्र भरण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती. मात्र, कोरोना महामारीत सीबीडीटीने ही मुदत ३१ मार्चवरून ३० जूनला आणि त्यांनतर ३१ जुलै केली होती.
दरम्यान, प्राप्तिकराचे विवरणपत्र भरण्याला मुदतवाढ देण्यासाठी केंद्र सरकारने कर आणि कायद्यात बदल करणारे आदेश यापूर्वीच काढले आहेत.
हेही वाचा-विजय मल्ल्याच्या कंपनीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ८ ऑक्टोबरला सुनावणी