नवी दिल्ली - लडाख हा शांत असलेला स्वर्ग असल्याने येथे पर्यटनाला बहर येईल, असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी व्यक्त केला. जागतिक पर्यटनाचे आकर्षणकेंद्र होण्याची क्षमता लडाखमध्ये असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. या विधानाबाबत पटेल यांनी सहमती दर्शविली आहे.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत लडाखच्या पर्यटनाबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीर आणि लडाखच्या पर्यटनाबद्दल जे काही बोलले आहे, ते सर्व सत्य आहे. लडाख हे जगातील सर्वात आदर्शवत असे ठिकाण आहे. पर्यटन विभाग हा लडाखवर लक्ष केंद्रित करणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लेहला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लडाख हे स्वच्छता आणि सांस्कृतिक वारशाचे आदर्श उदाहरण आहे. लडाखला भेट देणारे पर्यटक नक्कीच संतुष्ट होणार आहेत. सर्व प्रकारच्या पर्यटकांना हे ठिकाण आवडेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. लडाखमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीमध्ये तेथील शांतता आणि संस्कृतीवर परिणाम होवू न देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचेही प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी-
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले होते. त्यामध्ये त्यांनी लडाखमध्ये अध्यात्मिक पर्यटन, रोमांचक पर्यटन आणि पर्यावरण पर्यटन याचे मोठे केंद्र होण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. दरम्यान, लडाख हा केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला आहे.