नवी दिल्ली - पायाभूत क्षेत्रातील कंपनी लार्सन आणि टुर्बोला बुलेट ट्रेन प्रकल्पाचे ७ हजार कोटींचे कंत्राट मिळाले आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर या बुलेट ट्रेनचे काम करण्यात येणार आहे.
एल अँड टीने बुलेट ट्रेनच्या मिळालेल्या कंत्राटाची किंमत दिलेली नाही. मात्र, ही किंमत ७ हजार कोटी रुपयांची असण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात एल अँड टीला नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला (एनएचएसआरसीएल) ८७.५६९ किलोमीटर रस्त्याचे काम करावे लागणार आहे. यामध्ये नदीवरील पूल, एक रेल्वे स्थानक, देखभाल व दुरुस्तीचे डेपो आणि इतर कामांचा समावेश आहे.
असा आहे बुलेट ट्रेन प्रकल्प-
- मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रोजेक्ट (एमएएचएसआरपी) हा ५०८ किलोमीटरचा आहे. प्रकल्पामध्ये केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश आहे.
- बुलेट रेल्वेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास ३२० किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे धावणार आहे.
- बुलेट रेल्वे संपूर्ण अंतर २ तासात पूर्ण करणार आहे. तर सर्व स्थानकांवर रेल्वे थांबल्यास तीन तासात अंतर पूर्ण करणार आहे.
- राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ६३ टक्के जमीनेचे अधिग्रहण केले आहे. प्रकल्पासाठीची गुजरातमधील ७७ टक्के जमीन , दादर नगर हवेलीमधील ८० टक्के जमीन आणि महाराष्ट्रातील २२ टक्के जमीन लागणार आहे.
- मात्र, महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी यासारख्या भागात भूमी अधिग्रहण करण्याबाबत अद्यापही अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीची आर्थिक आणि तांत्रिक मदत जपान करणार आहे.
- जूनपर्यंत प्रकल्पावर ३ हजार २२६ कोटी रुपये खर्च झाला आहे.
शेअर बाजारात एल अँड टीचे शेअर १.२४ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर १,१६१.९५ रुपये आहे.