मुंबई - जीवनविमा ही कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. विमाधारकाचा अपघाती मृत्यू अथवा आजारपणानंतर विमा कंपनी कुटुंबाला करमुक्त, असा आर्थिक लाभ देते. मात्र विमा कंपनी काही गोष्टींबाबत विमा संरक्षण देत नाही.
आर्थिक अडचणीत सहाय्य करण्याबरोबर विमा कंपनी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देऊ शकते. असा विमा काही अटी आणि शर्तींसह लागू होत असल्याने त्याच्या अटी व शर्ती जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपला विम्याचा दावा कंपनी फेटाळून लावू शकते.
रोग असल्याची माहिती लपविणे-
जेव्हा विमा घेण्यात येतो, तेव्हा धुम्रपान आणि दारू पिण्याची सवय असल्यास माहिती देणे आवश्यक आहे. या शिवाय, असलेल्या रोगाची माहिती देणे गरजेचे असते. यामुळे विम्याचे योग्य संरक्षण मिळते. तसेच व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या रोगावरील दावे कंपनी फेटाळण्याची कमी शक्यता असते.
आत्महत्या करणे -
आत्महत्येचा प्रयत्न करत स्वत:ला जखमी केल्यास विम्याचा लाभ दिला जात नाही. विमा कंपनी ही विमा घेतल्यानंतर सुरुवातील फक्त पहिल्या वर्षापर्यंत आत्महत्या केल्यानंतर विम्याचा लाभ देते.उदाहरणार्थ एचडीएफसी टर्म इन्शुरन्स प्लॅन घेतल्यानंतर पहिल्या १२ महिन्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर लाभार्थ्याला केवळ ८० टक्के विम्याचा लाभ मिळू शकतो.
जीवाला धोका होणाऱ्या साहसी खेळात सहभाग घेणे-
रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, स्कायिंग यासारखे साहसी खेळ भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. हे सर्व खेळ असुरक्षित आणि जीवाला धोका असल्याने त्यांना विमा संरक्षणातून वगळण्यात येते.
हानिकारक व्यसन असणे -
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दारूमुळे दरवर्षी २.६ लाख भारतीयांचा मृत्यू होतो. हे मृत्यू सिरॉयसिस, कर्करोग तसेच दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होतात. दारू अथवा अंमली पदार्थांचे सेवन केल्याने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याला विम्याचा लाभ दिला जात नाही.
बेकायदेशीर कृत्ये करणे-
बेकायदेशीर कृत्ये करणे अथवा त्यात सहभाग घेतल्यासही विम्याचे संरक्षण दिले जात नाही. बेकायदेशीर कृत्य करताना मृत्यू झाल्यास विमा कंपनी दावे नाकारतात. उदाहरणार्थ पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यास गुन्हेगाराला विम्याचा लाभ दिला जात नाही.
( संतोष अग्रवाल - लेखक हे पॉलिसी बझार येथील जीवन विम्याचे सहयोगी संचालक आहेत. )