नवी दिल्ली - केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पानंतरची ९ फेब्रुवारीला होणारी बैठक सोमवारी (१८ फेब्रुवारी) होणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पातील मुख्य मुद्द्यांसह केंद्र सरकारला किती लाभांश द्यायचा यावर चर्चा करण्यात येणार आहे. अमेरिका दौ-याहुन परतलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारला आरबीआयकडून २८ हजार कोटींच्या लाभांशाची अपेक्षा आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष जुलै ते जून असून या दरम्यान सरकारला ४० हजार कोटींचा लाभांश दिला आहे. वित्तीय तुट उद्दिष्टाएवढी स्थिर ठेवण्यात केंद्र सरकारला यश आले नाही. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
अर्थसंकल्पात घेतलेले महत्त्वाचे निर्णय-
प्रभारी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे. या योजनेत ६० वर्षे वय पूर्ण केल्यानंतर कामगारांना मासिक ३ हजार रुपयांचं निवृत्तीवेतन सरकार देणार आहे. केंद्र सरकारने २ हेक्टरहून कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना प्राप्तीकरातून वगळले आहे.