नवी दिल्ली - चीन-अमेरिकामधील व्यापारी युद्धाचा फटका भारतीय भांडवली बाजाराला बसला आहे. गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बाजारपेठेत चांगली गुंतवणूक केली आहे. मात्र मे महिन्यात विदेशी गुंतवणुकदारांनी ३ हजार २०७ कोटी रुपये भांडवली बाजारातून काढून घेतले आहेत.
दीर्घकाळासाठी भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूक फायदेशीर आहे. असे असले तरी कमी कालावधीसाठी गुंतवणुकीत मेमध्ये अडथळे येत असल्याचे बजाज कॅपिटलचे गुंतवणुकदार विश्लेषक आलोक अग्रवाल यांनी सांगितले. विकसित देशांतील मध्यवर्ती बँकांनी पतधोरणात बदल केला आहे. त्यानंतर विदेशी गुंतवणुकदारांनी भारतामधील बाजारात गेल्या तीन महिन्यात गुंतवणुकीचे प्रमाण वाढविले होते.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी एप्रिलमध्ये भांडवली बाजारात १६ हजार ९३ कोटींची गुंतवणूक केली. तर मार्चमध्ये ४५ हजार ९८१ कोटींची गुंतवणूक केली. फेब्रुवारीमध्ये ११ हजार १८२ कोटींची देशातील भांडवली बाजारात गुंतवणूक केली आहे. निवडणुकीनंतर येणारी अनिश्चितता आणि चीन-अमेरिकामधील व्यापारी युद्ध यामुळे विदेशी गुंतवणुकदारांनी धोरण बदलल्याचे ग्रोनचे बाजार विश्लेषक हर्ष जैन यांनी सांगितले.