नवी दिल्ली - विमानातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेल्या विमानाचे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण आज झाले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने हा मान पटकाविला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने ११,१९१ विमानाचे दिल्लीहून दुबईला आज (शुक्रवारी) १० वाजून ४० मिनिटाला उड्डाण झाले. या विमानातील वैमानिकांसह सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतलेली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसमधील कॅप्टन डी. आर. गुप्ता आणि कॅप्टन आलोक कुमार नायक आणि केबीन क्रू सदस्य व्यंकट केल्ला, प्रवीण चंद्रा, प्रवीण चौगले आणि मनीषा कांबळे यांनी कोरोना लस घेतलेली आहे. हेच कर्मचारी फ्लाईट ११ १९६ या विमानाने दुबई-जयपूर-दिल्ली सेक्टरमधून परतले आहेत.
हेही वाचा-दरवाढीचा वणवा! महानगरांमध्ये मुंबई, हैदराबादनंतर बंगळुरूमध्येही पेट्रोल शंभरी पार
वंदे भारत मिशनमध्येही एअर इंडिया एक्सप्रेसचा सहभाग
विमान कंपनीने सर्व पात्र आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे. तसेच प्रवाशांचे आरोग्यही सुरक्षित राहू शकणार आहे. कोरोना महामारीत टाळबंदीदरम्यान विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वंदे भारत मिशनमध्येही एअर इंडिया एक्सप्रेसच्या पहिल्या विमानाने उड्डाण केले होते.
हेही वाचा-पीएमसी बँक तोडगा : आरबीआयकडून सेंट्रमला लघू वित्त बँक स्थापण्याची परवानगी
महामारीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध
कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची उड्डाणांवरील निर्बंध डीजीसीएने पुन्हा वाढविले आहेत. या निर्बंधामुळे ३० जुनपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची उड्डाणे पूर्वीप्रमाणे बंद राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध असले तरी नियोजीत यंत्रणेने परवानगी दिलेल्या विमान उड्डाणांना परवानगी असल्याचे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर २३ मे २०२० पासून निर्बंध आहेत. मात्र, वंदे भारत मोहिमेच्या विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मे २०२० पासून परवानगी आहे.