यवतमाळ - कोरोनाच्या लढ्यात आपण फक्त सोशल डिस्टंन्सिग ठेऊन चालणार नाही. तर आपल्याला कोणत्या गोष्टीपासून संसर्ग होऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टी सॅनिटाईज करायला हव्यात. घरातील सर्व वस्तू सॅनिटाईज करण्यासाठी यवतमाळच्या दोन महाविद्यालयीन युवकांनी एक आगळेवेगळे मशिन तयार केले आहे. या मशिनमुळे घरातील सर्व वस्तू सॅनिटाईझ करता येतील असा दावा या दोघांनी केला आहे.
या मशिनचे नाव 'व्हायरस सॅनिटायझेशन कॅबिनेट' असे ठेवण्यात आले आहे. अतिनील (ultraviolet Ray's) किरणांपासून मिळणाऱ्या उर्जेपासून वस्तुंचे निर्जंतुकीकरण करता येते. केदार देशपांडे, रितीक द्रोण असे मशिन तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. दोघेही यवतमाळमधील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात हे दोघे राहत असून सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. हे सॅनिटायझेशन मशिन त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केले आहे. अगदी कमी खर्चात या मशीनची निर्मिती केली आहे. हे मशीन व्यावसायिक स्वरूपात आणण्याचा त्यांचा मानस आहे.