ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केल्यानंतर तयार होणारा वैद्यकीय कचऱ्याची कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण विभागाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे.
महापालिका क्षेत्रातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये तयार होणारा वैद्यकीय कचरा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या आधारवाडी डंपिंगवर उघड्यावर टाकला जात होता. याबाबत डोंबिवलीतील किशोर सोहोनी या याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने आधारवाडी डपिंग ग्राऊंडवर महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांसह भेट दिली. त्यावेळी डपिंग ग्राऊंडवर कोविड रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या औषधांची वेष्टने, सुईंची वेष्टने, फळांच्या रसाचे रिकामे लहान खोके, कागदीबोळे आढळून आले.
विशेष म्हणजे महापालिकेचा कल्याण पश्चिम परिसरातील उंबर्डे येथे जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पाची दर दिवसाची क्षमता तीन मेट्रिक टन आहे. सध्या या प्रकल्पात एक हजार किलो कचरा प्रक्रियेसाठी येत आहे. तर, मोठ्या आकाराच्या प्लॅस्टिक पिशव्या उपलब्ध झाला नसल्यामुळे सफाई कामगारांनी डपिंग ग्राऊंडवर एकत्रित कचरा लाल रंगाच्या पिशव्यांमधून बांधून ठेवला आहे. मात्र, असा प्रकार यापुढे होणार नाही, असा खुलासा घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याने प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केला आहे.
दरम्यान, महापालिका हद्दीतील करोनाबाधित रुग्णांना कल्याण-भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रा केंद्रात ठेवले जाते. तिथेही प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या ठिकाणी कोरोनाचा कचरा आणि नियमितचा कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र कुंड्या ठेवण्यात याव्यात. वैद्यकीय कचरा उंबर्डे येथील वैद्यकीय प्रक्रिया केंद्रात नेण्यात यावा. या सर्व जैविक वैद्यकीय कचऱ्याची माहिती महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑनलाइनद्वारे देण्याचे आदेश प्रदूषण मंडळाचे कल्याण विभागाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी दिले आहेत.