नागपूर - नागपूरसह विदर्भातील जिल्हे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण व्हावेत व ऑक्सिजनचा तुटवडा कुठेही जाणवणार नाही, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्सिजनच्या स्थितीबाबत आणि पुरवठ्याबाबत येण्याऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीला नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, वाहतूक पुरवठादार प्यारे खान आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील ऑक्सिजनची सद्यस्थिती काय आहे, या जिल्ह्यांना रोज किती ऑक्सिजनची गरज आहे, पुरवठा किती होतो, प्रत्येक जिल्ह्याची ऑक्सिजन साठवणूक क्षमता किती आहे, अशी सर्वंकष माहिती या बैठकीतून घेण्यात आली. पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
रुग्णालयांनी ऑक्सिजन प्लांटही सुरू करावेत -
भिलाई स्टील, विशाखापट्टणम, स्थानिक ऑक्सिजन प्लांट, तसेच नागपूर आणि विदर्भातील अन्य ठिकाणांहून मिळत असलेल्या ऑक्सिजनच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभा करण्याच्या सूचना संबंधित रुग्णालयांना देण्यात याव्या. तसेच हवेपासून तयार होणाऱ्या ऑक्सिजन प्लांटही सुरु व्हावेत, यासाठीही रुग्णालयांना सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले.
ऑक्सिजनची मागणी आणि नियोजन -
आज करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे वर्धा येथे दररोज 40 मे टन, यवतमाळ येथे दररोज 20 मे टन, चंद्रपूर येथे 20 टन, अमरावती येथे 20 टन, भंडारा आणि गोंदिया येथे दररोज प्रत्येकी 10 टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले. अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांना पुण्यातून ऑक्सिजन पुरवठा होत असून या जिल्ह्यांची मागणी आल्यास त्यांनाही ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी दिले.
तसेच ज्या जिल्ह्यात आणि रुग्णालयात साठवणूक क्षमता नाही, अशा रुग्णालयांनी साठवणीची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पुरवठादार यांनी ऑक्सिजन टँकरच्या दिवसभरात जास्तीत जास्त फेऱ्या कशा होतील? याचे नियोजन करण्याचे निर्देशही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.