लातूर - गेल्या आठवड्यात लातुरात दिवसाला 8 ते 10 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत होती. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून एकाही नव्या कोरोना रुग्णाची जिल्ह्यात नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा ताण कमी झाला असून यामुळे लातूरकरांसाठी दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 69 वर जावून पोहचली होती. लातुरात मुंबई - पुण्याहून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही वाढतच होता. त्यामुळे जिल्ह्यात 27 कंटेन्मेंट झोन करण्यात आले होते. वाढ्त्या रूग्ण संख्येमुळे जिल्हा प्रशासनावरील ताणही वाढला होता. मात्र, रविवार पासून एकही नवा कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.
मंगळवारी लातूर आणि उदगीर या मुख्य शहरातील 23 जणांचे नमुने तपासणीसाठी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात आले होते. यापैकी सर्व अहवाल हे निगेटिव्ह आल्याचे प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, वाढत्या रुग्ण संख्येला ब्रेक लागल्याने जिल्हा प्रशासनावरील ताण तर कमी झाला आहे. याशिवाय उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची प्रकृती ठणठणीत होत आहे. लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.