वेलिंग्टन - न्यूझीलंड क्रिकेट संघाने विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यात अनकॅप्ड यष्टीरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेलला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ब्लंडेलने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला नाही. तरीही त्याची राखीव यष्टीरक्षक म्हणून संघात निवड झाली आहे.
त्याच्या निवडीबाबत बोलताना न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, टॉम लॉथम जखमी झाला तर त्याच्या जागी ब्लंडेल खेळेल. २८ वर्षीय ब्लंडेलला यष्टीरक्षणातील कौशल्य पाहून निवडण्यात आले आहे.
ब्लंडेलने डिसेंबर २०१७ साली विंडीजविरुद्ध खेळताना कसोटीत पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात त्याने तडाखेबाज शतक ठोकले होते. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिलाच यष्टीरक्षक ठरला. त्याने न्यूझीलंडकडून २ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळले आहे.
ब्लंडेलने लिस्ट 'ए'चे ४० सामने खेळताना ७६२ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३७ झेल घेतले असून ४ फलंदाजांना यष्टीचीतही केले आहे.