मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जून-जुलै महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका जाणवू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी पालिकेने लहान मुलांसाठी वरळी येथे ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेला सीएसआर फंडामधून ५० कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामधून हे कोविड सेंटर उभारले जाणार आहे. तसेच २० हजार खाटांच्या रुग्णालयांसाठी ऑक्सिजन निर्मितीही करण्यात येणार आहे.
लहान मुलांसाठी कोविड सेंटर -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू होताच रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्याने पालिकेने पाच ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारले. यामुळे रुग्णांवर उपचार करताना अडचणी आल्या नाहीत. मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत १८ वर्षाखालील लहान मुलानाही कोरोनाची लागण झाली आहे.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोची लागण होण्याची शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. यामुळे मुंबईत वरळी येथे पालिकेच्या माध्यमातून ५०० खाटांचे लहान मुलांसाठी जम्बो कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे. एक वर्ष ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना येथे दाखल केले जाणार असून लहान मुलांबरोबर आई असणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन क्युबिकल पद्धतीने या जम्बो केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. या कोविड सेंटरमध्ये ७० टक्के ऑक्सिजन खाटा असतील तर २०० आयसीयू खाटा असणार आहेत. हे लहान मुलांचे जम्बो कोविड केंद्र ३१ मे पूर्वी उभारण्याचा पालिकेचा मानस आहे.
कोविड सेंटरमध्ये २० हजार खाटा -
मुंबईत तीन ठिकाणी प्रत्येकी दोन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यातील एक मालाड येथे तर सायनच्या सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुरमार्गच्या क्रॉम्प्टन कंपनीत नवीन जम्बो रुग्णालये उभी करण्यात येतील. आताची चारही जम्बो कोविड सेंटर उभारताना आवश्यकतेनुसार विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सर्व केंद्रात गरजेनुसार प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार अधिक खाटा उभारता येणार आहेत. जूनच्या मध्यावधीपर्यंत साडेसहा हजार अतिरिक्त खाटांची जम्बो कोविड सेंटर उभी राहतील. येत्या काळात एकूण ११ जम्बो कोविड सेंटर असतील. यात एकूण सुमारे २० हजार खाटा असणार आहेत व ती १०० टक्के ऑक्सिजनवर आत्मनिर्भर असलेली असतील.
सीएसआर फंडातून ५० कोटींची मदत -
कोरोना काळात अनेक कंपन्या व उद्योग समूह मुंबई महापालिकेला मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबई महापालिकेला ‘सीएसआर‘ मधून पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. आता अवघ्या दोन दिवसात ५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी ३५ कोटी रुपये ‘एचडीएफसी‘ने जाहीर केले आहेत. त्यातून ऑक्सिजन प्लांट तसेच वरळीचे जम्बो कोविड रुग्णालय उभे केले जाणार आहे. याशिवाय डिझ्ने व स्टार वाहिनीचे माधवन यांनी लंडन येथून दूरध्वनी करून १२ कोटी ५० लाख रुपयांचे ९० व्हेंटिलेटर देण्याचे जाहीर केले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश पालिकेला दिला आहे.