हिंगोली- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 जुलैला रात्री आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील वारंगा फाटा येथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी विदेशी दारूसाठा व इतर साहित्य असा ९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा परिसरात विदेशी दारूची चोरटी विक्री, तसेच चोरटी वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या भागात पथक लक्ष ठेवून होते. नंतर 6 जुलै रोजी पथकाने सापळा रचून सदर परिसरात छापा टाकला असता येथे अवैध विदेशी दारूची चोरटी विक्री व वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यात नांदेड पासिंगची क्र. (एम.एच. 26 ए. के.4053) बोलेरो कंपनीच्या जीपमध्ये दारूची चोरटी वाहतूक होत असल्याचेही आढळले.
पोलिसांनी घटनास्थळावरील अमोल गणपतराव वाकोडे (गजानन बार मालक, बामणी फाटा रा. पिंपरखेड ता. हदगाव जि. नांदेड) संतोष गणेश आप्पा पत्रे (रा तोंडापूर ता. कळमनुरी जि हिंगोली) यांच्या ताब्यातून 18 लाख रुपये किमतीचे बोलेरे वाहन व 96 हजार रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. तर, दोन 22 हजार 200 रुपयांचे मोबाईल जप्त केला आहे.
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अमोल अशोकराव पावडे, संतोष गणेशअप्पा पत्रे, अनिकेत अशोकराव पावडे, वैभव देशमुख या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नी जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे आदींनी केली आहे.