भरतपूर (राजस्थान) Youth Killed By Tractor : राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाची चक्क ट्रॅक्टरनं चिरडून हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका तरुणाच्या अंगावर तब्बल ६ वेळा ट्रॅक्टर चावलण्यात आला. या प्रकरणी ६ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेत एकूण १२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर बायना सीएचसी आणि भरतपूर येथील आरबीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय आहे प्रकरण : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातल्या बयाना तालुक्यातील अड्डा गावात दोन गटांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता. चार दिवसांपूर्वी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बुधवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी जमिनीच्या वादातून पुन्हा एकदा दोन्ही बाजूचे लोक आमनेसामने आले. या दरम्यान एक व्यक्ती ट्रॅक्टर घेऊन वादग्रस्त जागेवर पोहोचला. तेव्हा दुसऱ्या बाजूचा एक तरुण त्याला थांबवण्यासाठी जमिनीवर आडवा झाला. मात्र या व्यक्तीनं मागचा पुढचा विचार न करता सरळ त्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढवला. तरुणाचा मृत्यू होईपर्यंत आरोपी पुन्हा पुन्हा त्याच्यावर ट्रॅक्टर चालवत राहिला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला असून, त्यात आरोपी तरुणावर ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.
हत्येनंतर आरोपींनी पळ काढला : बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दरम्यान दोन गटांमध्ये हाणामारीही झाली. त्यांनी एकमेकांवर लाठ्या-दगड्यांनी हल्ला केला. यात महिलांचाही समावेश होता. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जमावाला घटनास्थळावरून पांगवण्यासाठी आरोपी गटानं हवेत गोळीबार केल्याचंही सांगितलं जात आहे. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
हेही वाचा :