कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. तृणमूलचे ग्रामीण चेहरा असलेले सुवेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. बंगालच्या राजकारणात दबदबा असलेल्या अधिकारी भाजपात सहभागी झाल्याने भाजपला त्यामुळे अधिकच बळ मिळालं आहे. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले. ते एका संबोधीत करत होते.
मी टीएमसी सोडण्याचा आणि भाजपात सामील होण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. लोकांनी त्याला मान्यता दिली आहे. मेळाव्यातील गर्दी पाहून मी हे म्हणू शकतो, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले. सुवेंदू हे येत्या 8 जानेवारी रोजी नंदीग्राममध्ये सभेला संबोधीत करणार आहेत. याअगोदर एक दिवस म्हणजेच 7 जानेवारी रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही नंदीग्राममधील सभांना संबोधीत करणार आहेत. नंदीग्राममध्ये आपले (ममता बॅनर्जी) स्वागत आहे. भाषणात तुम्ही जे बोलाल, त्यावर मी दुसर्या दिवशी प्रतिसाद देईन, असे सुवेंदू म्हणाले.
पहिल्यांदाच भाजपा नेते म्हणून आपल्या बालेकिल्ल्यात त्यांनी मोर्चा काढला. पूर्व व पश्चिम मेदिनापूर जिल्ह्यातील सर्व 35 जागा भाजपा जिंकेल हे मी सुनिश्चित करले. दिलीप घोष आणि मी बंगालच्या उपसागरातील वालुकामय माती आणि जंगलमहलची लाल माती एकत्र केली आहे, आता आम्ही बंगालमध्ये कमळ फुलवल्याशिवाय झोपणार नाही. ममता बॅनर्जींचा पक्ष राज्यातील 2021 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर येईल, तर भाजप प्रथम असेल, असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला.
सुवेंदू अधिकारी यांचा तृणमूलला रामराम -
तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी प्रथम कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर 16 डिसेंबरला त्यांनी आमदारिकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलीच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सुवेंदू यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. आमदार शीलभद्रा दत्त आणि बन्सारी मैत्य यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे 148 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. गेली निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाने 211 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व पश्चिम बंगालमधील आपली सत्ता राखली. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.
हेही वाचा - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टेजवरच कलाकारांसोबत धरला ठेका