कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय राजकारणात उतरत असल्याचे दिसत आहे. खासदार नसतानाही ममता बॅनर्जी यांची संसदीय दल नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ही माहिती दिली. ममता बॅनर्जी येत्या 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करत असल्याचे बोलले जात आहे.
ममता बॅनर्जी 25 जुलैला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यापूर्वींच संसदीय पक्षाच्या नव्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात ममता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडेही भेटीसाठी वेळ मागितला आहे. याचबरोबर त्या काँग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी आणि इतर विरोधी पक्षांचीही भेट घेऊ शकतात. आगामी सार्वत्रिक निवडणुका पाहता, ममता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.
ममता बॅनर्जी खासदार नसतानाही त्यांची संसदीय दल नेतेपदी निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर ममता सातवेळा खासदार राहिल्या असून याआधीही आम्हाला मार्गदर्शन करत होत्या. हा आमचा रणनीतीक निर्णय आहे, असे डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले. तथापि, कोणताही पक्ष आपल्या ज्येष्ठ खासदाराची पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करतो. ही पक्षाची अंतर्गत बाब असून याचा नियमांशी काही संबंध नाही. बंगालमध्ये मोदी आणि शाह जोडीला पराभूत केल्यानंतर ममतांची पत वाढली आहे. अशा परिस्थितीत स्वत: ममता आणि त्यांचा पक्ष देशाच्या पंतप्रधानांच्या खुर्चीवर दिदीला पाहू इच्छित आहे.
ममतांची केंद्र सरकारवर उघडपणे टीका -
ममता विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेराव घालत आहेत. कोरोना व्यवस्थापन, पेगासस हेरगिरी प्रकरण आणि माध्यमांवर धाड टाकल्याबद्दल ममता यांनी केंद्र सरकारवर उघडपणे टीका केली होती. आता टीएमसीच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष झाल्यानंतर देशपातळीवर त्या थेट पक्षाचा अधिकृत चेहरा बनल्या आहेत .म्हणजेच पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील कोणत्याही विषयावर विरोधी पक्षांच्या संसदीय मंडळाच्या नेत्यांची बैठक बोलावली, तर ममतांना बोलावले जाईल.
ममता मोदींना तोडीस तोड -
पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला आव्हान दिले आहे. अनेक नेत्यांनी ममता या मोदींना तोडीस तोड असल्याचेदेखील म्हटले होते. ममतांचा स्पष्टपवक्तेपणा आणि उज्ज्वल प्रतिमादेखील त्यांना मोदींसमोर विरोधी पक्षनेते म्हणून सादर करते.