फिरोजाबाद Two Children Burnt Alive : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात शनिवारी रात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळं भीषण अपघात झालाय. आगीच्या ठिणगीमुळं झोपडीला आग लागली. यात झोपेत असलेली दोन मुलं जिवंत जळाली आहेत. तर एक मुलगी आणि तिचे वडील यात गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या संपूर्ण घटनेमुळं गावात शोककळा पसरली आहे.
कुटुंब झोपेत असताना झोपडीला आग : जसराणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडित गावातील ही घटना आहे. गावाबाहेर बंजारा वसाहत आहे. या वसाहतीत झोपडीत राहणारा सलीम हा दीड वर्षाचा मुलगा अनिश, अडीच वर्षांची मुलगी रेश्मा आणि पाच वर्षांची मुलगी सामना यांच्यासोबत झोपला होता. मिळालेल्या माहितीनुसार, थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवण्यात आली होती. रात्री सगळे झोपले होते. यादरम्यान आगीच्या ठिणग्यांमुळं रात्री दहा वाजता झोपडीला आग लागल्याचा संशय आहे. काही वेळातच या आगीनं उग्र रुप धारण केलं. या आगीत सलीम आणि त्यांची मुलं गंभीररीत्या भाजली. आगीनं भीषण रुप धारण केल्यानं झोपडीत झोपलेल्या लोकांना बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही.
आगीत दोन मुलांचा मृत्यू : ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आलं नाही. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलीस व अग्निशमन विभागाला दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकानं सर्व जळालेल्या लोकांना जिल्हा रुग्णालयात पाठवले, त्यापैकी अनिश आणि मुलगी रेश्मा यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. तर मुलगी सामना आणि तिचे वडील सलीम यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
शेकोटीमुळं आग लागल्याचा संशय : थंडीपासून वाचण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळं हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलीस अधीक्षक देहत कुंवर रणविजय सिंह यांनी सांगितलं की, जसराना पोलीस स्टेशन हद्दीतील खडित गावाजवळील बंजारा वसाहतीमध्ये रात्री 8.30 वाजता आग लागली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून झोपडीत अडकलेल्या सर्व जळालेल्या लोकांना रुग्णालयात पाठवले. यात दोन मुलांचा मृत्यू झालाय, तर इतर भाजलेल्यांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :