प्रयागराज (उ. प्रदेश) : उमेश पालची हत्या करणाऱ्या शूटरला सोमवारी सकाळी प्रयागराजमध्ये पोलिसांनी चकमकीत ठार केले. विजय चौधरी उर्फ उस्मान असे त्याचे नाव आहे. उमेश पाल यांच्यावर उस्माननेच पहिली गोळी झाडली होती.
उस्मानने पहिली गोळी झाडली होती : उमेश पाल खून प्रकरणी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते की, उमेश पाल यांची गाडी थांबताच त्यांच्या जवळ गेलेल्या उस्मानने पिस्तुलातून पहिली गोळी झाडली होती. सोमवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी त्याला ठार केले. प्रयागराजच्या कौंधियारा पोलिस स्टेशन परिसरात पोलिस आणि बदमाशांमध्ये ही चकमक झाली. गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक येथे पोहोचले होते.
उस्मान प्रयागराजचा रहिवासी : पोलिसांना पाहताच शूटर उस्मान उर्फ विजय चौधरी याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. ज्यात शूटर उस्मानला गोळी लागली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी एसआरएन रुग्णालयात पाठवले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला उस्मान हा प्रयागराजचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
उस्मानवर 50 हजार रुपयांचे बक्षीस : उमेश पालच्या हत्येला सोमवारी 10 दिवस झाले. या प्रकरणी प्रयागराज पोलिस आणि यूपी एसटीएफ सातत्याने छापे टाकत आहेत. या आधी सरफराज नावाचा आरोपीही चकमकीत मारला गेला होता. हत्येच्या वेळी सर्फराज कार चालवत होता. गोळीबाराच्या व्हिडिओमध्ये विजय चौधरी उर्फ उस्मान दिसल्यानंतर पोलिसांनी उमेश पालच्या शूटरवरील बक्षीसाची रक्कम अडीच लाखांपर्यंत वाढवली होती. उस्मानवर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते.
नातेवाईकांच्या मालमत्तेवर चालवला बुलडोझर : उमेश पाल खून प्रकरणात स्थानिक पोलिसांनी आरोपींच्या नातेवाईकांवर बुलडोझरने कारवाई केली आहे. हत्येतील आरोपी व बाहुबली नेता अतीक अहमदसह सह आतापर्यंत अतिकच्या तीन नातेवाईकांवर बुलडोझरची कारवाई केली गेली आहे. प्रयागराजमधील ज्या घरात अतिकची पत्नी आणि मुले आश्रयास होते त्या घरावर देखील बुलडोझर चालवला गेला आहे.