चित्रकूट - उत्तर प्रदेशातील चित्रकूट कारागृहात शुक्रवारी दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात तीघांचा मृत्यू झाला आहे. बातमीनुसार गुंड मुकीम काला यांच्यावर अंशु दीक्षितने गोळीबार केला. यात मुकीमचा जागीच मृत्यू झाला. मेराज अली नावाचा आणखी एक गुन्हेगारही बंदुकीच्या गोळीने जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. मेराज अली हा बहुजन समाज पक्षाचे आमदार मुख्तार अन्सारी यांचे निकटचा विश्वासू असल्याचे म्हटले जाते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तुरुंगात धाव घेतली. अंशु दीक्षितने या दोघांची हत्या केल्यानंतर तुरुंगातील आणखी पाच कैद्यांनाही बंदी बनवलं होतं. आरोपी अंशु दीक्षितला आत्मसमपर्ण करण्यास सांगितले. मात्र, दीक्षितने आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. सध्या तुरुंगात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. काही दिवसांपूर्वी सुल्तानपूर तुरुंगातून चित्रकूट येथील तुरुंगात अंशु दीक्षित याला हलवण्यात आले होते.
संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झालेले तिन्ही गुन्हेगार हे कुख्यात गँगस्टर होते. या गुन्हेगारांचं आपसांतही शत्रूत्व होतं, त्यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मात्र, तुरुंगामध्ये शस्त्रे कशी पोहचली, हा प्रश्न उपस्थित होतो. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तुरुंगातील सर्व बॅरेक्सचा शोध घेण्यात येत असल्याचे चित्रकूटचे एसपी अंकित मित्तल यांनी सांगितले. यापूर्वीही अशीच घटना चित्रकूट तुरुंगात घडली होती. जुलै 2018 मध्ये गुंड मुन्ना बजरंगीला बागपतला कैदी सुनील राठीन गोळ्या घालून ठार केले होते.
मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल -
या प्रकरणाची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून अधिकाऱ्यांना 6 तासांत घटनेचा अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयुक्त चित्रकूट डीके सिंह, पोलीस महानिरीक्षक सत्यनारायण आणि कारागृह मुख्यालयाचे उपनिरीक्षक संजीव त्रिपाठी यांची संयुक्त टीम तयार केली आहे. ही संयुक्त टीम सहा तासत मुख्यमंत्र्यांना अहवाल देईल.
हेही वाचा - 'लव्ह यू जिंदगी' म्हणणाऱ्या तरुणीचा कोरोनाने घेतला बळी; नेटकरी झाले भावूक