हैदराबाद- केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल ९ राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यात पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि केरळ या राज्यांचा देखील समावेश आहे. हिवाळा आणि सणासुदीचे दिवस असल्याने या राज्यांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशी चिंता आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
हर्षवर्धन यांनी याबाबत आंद्र प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, राजस्थान, हिमांचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, हरयाणा, केरळ या राज्यातील आरोग्य मंत्री, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांशी संवाद साधला. यावेळी, भारतातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे जगापातळीवर सर्वाधिक जास्त असून मृत्यूंचे प्रमाणही सर्वाधिक कमी असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
दरम्यान, देशात कोरोनाची एकूण रुग्ण संख्या ही ८५ लाख ५३ हजार ६५७ इतकी आहे. यातील १ लाख २६ हजार ६११ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, ७९ लाख १७ हजार ३७३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. देशात ५ लाख ९ हजार ६७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई - राज्यात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभरात ३ हजार २७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर, ८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १७ लाख २३ हजार १३५ वर पोहोचला आहे. तर, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४५ हजार ३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १८.१७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
नवी दिल्ली - ८ नोव्हेंबरला दिल्लीत ७ हजार ७४५ कोविड रुग्ण आढळून आले होते. एका दिवसात इतके रुग्ण मिळून आल्याचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. दिल्लीत २४ हजार ७२३ रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. तसेच, कंटेन्मेंट झोन्सची संख्या ही ३२ टक्क्यांनी वाढली आहे.
तेलंगणा - तेलगू अभिनेता चिरंजिवी यांना कोरोना झाला आहे. त्यांनी काल याबाबत माहिती दिली. तसेच, गेल्या ५ दिवसात जी कोणी व्यक्ती मला भेटली असेल, त्यांनी कोविड चाचणी करावी, असे आवाहन चिरंजिवी यांनी केले.
हेही वाचा- बिहारचा सत्ताधीश कोण? उद्या होणार फैसला; मध्यप्रदेशचीही मतमोजणी