नवी दिल्ली - कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवं राजकीय संकट देखील आलं आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात पंजाब काँग्रेस सत्तेत आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये आता अंतर्गत कलह वाढू लागले आहेत. त्यातून पंजाब काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना दिल्लीला बोलावले आहेत. कॅप्टनदेखील आपल्या पातळीवर वाद मिटविण्याचा आणि संतप्त नेत्यांच्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंजाब काँग्रेसमधील अशांततेवर तोडगा काढण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना 20 जून रोजी दिल्लीत बोलावल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनिया गांधी दोघांची भेट घेण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पंजाबमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पर्याय नाही आणि म्हणूनच आगामी 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील. आता पुढील वर्षात विधानसभा निवडणूक होणार असल्याने, काँग्रेस हायकमांड हा अंतर्गत कलह मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.
पंजाबमधील राजकीय समीकरण -
पंजाब विधानसभा निवडणूक 2017 साली पार पडली होती. यावेळी 117 जागांसाठी मतदान पार पडले. 11 मार्च 2017 रोजी मतगणना केली गेल्यावर काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळाल्याचे निष्पन्न झाले. अकाली दल व भाजपा युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीला देखील अपेक्षित यश मिळाले नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दल व भाजपाची युती तुटली आहे. शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष सोबत लढणार आहेत. यामुळं पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.