जयपूर : मणिपूर हिंसाचारावरुन सध्या देशभरात संताप पसरला आहे. मणिपूर हिंसाचारावरुन भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांच्यावर निशाणा साधला. ऐझॉलमध्ये बॉम्ब टाकल्यामुळेच इंदिरा गांधी यांनी राजेश पायलट यांना 'इनाम' दिल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला होता. त्यावर आता सचिन पायलट यांनी जोरदार पलटवार केला आहे. सचिन पायलट यांनी त्यांचे दिवंगत वडील राजेश पायलट यांचे भारतीय हवाई दलातील 'कमिशन' झालेले पत्रच ट्विट केले आहे. या दोघांच्या ट्विटर 'वॉर'मध्ये त्यांच्या समर्थकांनीही चांगलाच वाद रंगवला आहे.
काय आहेत अमित मालवीय यांचे आरोप : भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी सचिन पायलट यांचे वडील दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी यांनी वैमानिक असताना 5 मार्च 1966 मध्ये ऐझॉलमध्ये बॉम्ब टाकला होता. त्यामुळेच इंदिरा गांधी यांनी या दोघांना काँग्रेसचे तिकीट देऊन त्यांना नंतर मंत्रीही केल्याचा आरोप केला होता. अमित मालवीय यांच्या या आरोपाने चांगलीच खळबळ उडाली आहे.
सचिन पायलट यांनी केला पलटवार : अमित मालवीय यांनी केलेल्या या आरोपामुळे राजेश पायलट यांचा मुलगा आणि राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ऐझॉलमध्ये बॉम्ब टाकल्याची घटना ही 5 मार्च 1966 मध्ये घडली होती. मात्र दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांचे भारतीय हवाई दलात 29 ऑक्टोबर 1966 ला 'कमिशन' झाले होते, असा पलटवार सचिन पायलट यांनी केला. यावेळी त्यांनी राजेश पायलट यांचे हवाई दलात झालेल्या 'कमिशन'चे पत्रही ट्विट केले आहे.
माझ्या वडिलांनी बॉम्ब टाकले पण . . : सचिन पायलट यांनी अमित मालवीय यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. माझ्या वडिलांनी बॉम्ब टाकले, मात्र अमित मालवीय यांनी सांगितलेल्या ठिकाणी त्यांनी बॉम्ब टाकले नसल्याचे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले. माझ्या वडिलांनी 1971 च्या भारत पाक युद्धात बॉम्ब टाकल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 80 च्या दशकात एका राजकीय नेत्याच्या रुपात माझ्या वडिलांनी मिझोराममध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -