भुवनेश्वर Royal Bengal Tiger : चंद्रपुरातील वाघ 2000 किलोमीटर प्रवास करुन महाराष्ट्रातून ओडिशापर्यंत पोहोचला. या वाघाला जंगलाजवळ भटकताना लोकांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एका गायीची वाघानं शिकार केली. वाघाला पाहून लोकांमध्ये घबराट पसरलीय. त्यांनी तत्काळ माहिती वनविभागाला देण्यात आलीय. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत वाघाचा शोध घेतला. त्याची छायाचित्रे आणि इतर माहिती भारतीय वन्यजीव संस्थेला पाठवण्यात आली आहे. यामुळं हा वाघ ओडिशात कुठून आला हे शोधता येईल. यानंतर वनविभागानं नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. 35 जणांच्या 5 टीम त्याच्या शोधात व्यस्त आहेत यामुळं या वाघावर नियंत्रण ठेवता येईल.
जून 2023 पासून ओडिशात फिरतोय वाघ : ओडिशाच्या परलाखेमुंडी विभागाचे वन अधिकारी एस. आनंद यांनी या नर वाघाच्या अंगावरील पट्ट्यांचा नमुना महाराष्ट्राच्या जंगलात आढळलेल्या वाघाच्या अंगावरही असल्याचं सांगितलं. त्यावरुन अंदाज बांधता येतो की, तो सुमारे दोन हजार किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातून तिथं गेलाय. जंगलाला लागून असलेल्या अनलाबारा गावातील लोकांनी त्याला पाहिलं आणि आता ते घाबरले आहेत. मात्र, जून 2023 मध्ये राज्यातील जंगलांमध्ये हा वाघ पहिल्यांदा दिसला होता. तेव्हापासून तो कधी ओडिशाच्या रायगडा विभागात तर कधी आंध्र प्रदेशच्या परिसरात फिरताना दिसत होता. वाघ सप्टेंबरमध्ये गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी जंगलात दाखल झाला. 18 ऑक्टोबरला वाघानं शेडमधून गाय ओढून नेली. गायीच्या मालकाला तिचे अर्धे खाल्लेले अवशेष सापडले आहेत.
गेल्या एका महिन्यात 500 किमी केला प्रवास : गेल्या 30 वर्षांपासून गजपतीमध्ये एकही वाघ दिसल्याची नोंद नाही. त्यामुळं गायीची शिकार करणारा हा वाघ किंवा बिबट्या असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. ठोस माहिती मिळविण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवून त्याची छायाचित्रं घेण्यात आली. वनविभागानं ही छायाचित्रे डेहराडून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पाठवली. हे छायाचित्र महाराष्ट्राच्या ब्रह्मपुरी वनविभागानं यापूर्वी काढलेल्या वाघाच्या छायाचित्राशी जुळलंय. या वाघानं तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड ओलांडून ओडिशा गाठलंय. गेल्या एका महिन्यात वाघानं 500 किलोमीटरहून अधिक अंतर कापलंय. परलाखेमुंडी ते श्रीकाकुलम, नंतर इच्छापुरम आणि परत परलाखेमुंडी असं त्यानं अंतर कारलंय. महाराष्ट्रातून वाघ ओडिशात पोहोचण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा :