गुवाहाटी (आसाम) - रॅगिंगदरम्यान होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. रविवार (दि. 26 नोव्हेंबर)रोजी दुपारी या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या शनिवारची आहे. एम. कॉम.च्या पहिल्या सेमिस्टरचा विद्यार्थी आनंद शर्माचा छळ सकाळपर्यंत सुरूच होता. या छळापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारावी लागली. या घटनेसंदर्भात विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये शनिवारी सायंकाळी 4.30 वाजल्यापासून पद्मनाथ गोहेन बरुआ वसतिगृहात विद्यार्थी आनंद शर्मा याचे मानसिक आणि शारीरिक शोषण करण्यात आल्याचा उल्लेख आहे. रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी शर्मा यांची छेड काढली.
दिब्रुगड विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी 10.30 वाजता आनंद शर्माने मानसिक आणि शारीरिक छळ टाळण्यासाठी बाथरूममध्ये जाण्याचे निमित्त केले. त्यानंतर त्याने वसतिगृहाच्या बी ब्लॉकमधून उडी मारली. त्यामुळे शर्मा गंभीर जखमी झाले. वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी गंभीर अवस्थेत शर्मा यांना जवळच्या रुग्णालयात नेले, असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने शर्मा यांना चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहे.
कथित रॅगिंग प्रकरणात विद्यापीठाच्या एका माजी विद्यार्थ्यासह पाच विद्यार्थ्यांची नावे विद्यापीठ प्रशासनाने एफआयआरमध्ये नोंदवली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे, पोलीस फरार माजी विद्यार्थी राहुल छेत्रीचा शोध घेत आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शर्मा हा एम.कॉमच्या पहिल्या सेमिस्टरचा विद्यार्थी आहे. त्यांच्यावर दिब्रुगडमधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे पीडित मुलाची आई सरिता शर्मा यांनी सांगितले की, माझ्या मुलाचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. येथील त्याचे वरिष्ठ त्याला दारू पिण्यास भाग पाडायचे. दरम्यान, त्याने मला आधी हॉस्टेल सोडायचे आहे म्हणून सांगितले होते. मात्र, भाड्याची रुम आपल्याला परवडणार नाही म्हणून मीच त्याला करू दिली नाही असही त्याची आई म्हणाली आहे. परंतु, वसतिगृहात त्याचा अशा प्रकारचा छळ होत आहे असे मला कधीच वाटले नव्हते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान, वरिष्ठांकडे तक्रार करून नको म्हणून धमकीही दिली गेली असही समोर आले आहे.