नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. देशात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीमार्फत लसीकरण सुरू आहे. यातच दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील नागरिकांना मिळणारी लस आता भारतीयांसाठीही उपलब्ध होणार आहे. अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीला भारतात मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला यांनी ही माहिती दिली.
फायझर लसीला भारतात वापरण्यासाठी मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सरकारबरोबरचा करार लवकरच पूर्ण होईल. लसींची आयात वाढवण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने ही प्रकिया सोपी झाली आहे. जागतिक आरोग्य संस्थेकडून मंजुरी मिळालेल्या लसींची चाचणी म्हणजेच ब्रिजींग ट्रायल करण्यात येणार नसल्याचा निर्णय डीजीसीआयने घेतला आहे.
अमेरिका-भारत चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित 15 व्या भारत-यूएस ड्रग अँड हेल्थ सर्व्हिसेस समिटला संबोधित करताना डीसीजीआय प्रमुख सोमाणी यांनी सांगितले, की फायझरने एक विशेष योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत भारतासह मध्यम व निम्न-उत्पन्न देशांना फायझर लसीचे किमान दोन अब्ज डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भारतातील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन व्यतिरिक्त, रशियाच्या लस स्पुटनिक व्हीच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे. स्पुटनिक ही भारतात कोरोना संसर्गाविरूद्ध तिसरी लस आहे. 'स्पुटनिक व्ही'तिसर्या टप्प्यातील चाचणीच्या अंतरिम निकालांमध्ये 91.6 टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे.दरम्यान 70 डिग्री तापमानात स्टोअर केली जाणारी फायझर लस भारतात कशा पद्धतीनं साठवली जाणार ही समस्या आहे.
फायजर लस विशेषता...
- फायजर लस डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी असल्याचा दावा आहे.
- फायजर लस 95 टक्के परिणामकारक.
- ही लस तयार करण्यासाठी 10 महिन्यांचा अवधी लागला होता.
- जेनेटिक तंत्रज्ञानाच्या आधारावर विकसित आहे फायझर लस.
- 16 वर्षावरील वयोगटातील लोकांना देता येणारी एकमेव लस
- फायझर लस ही लहान मुलांसाठी सुरक्षित