नवी दिल्ली - अमेरिकन बहुराष्ट्रीय फार्मा कंपनी फायजरने आणीबाणीच्या काळात कोरोना लस वापराचा परवाना मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र, कंपनीने आपला अर्ज मागे घेतला आहे. भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयाच्या विषय तज्ज्ञ समितीसोबत नुकतीच कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
अतिरिक्त माहिती लवकरच सादर करणार -
३ फेब्रुवारीला फायजर कंपनीचे अधिकारी आणि कोरोनावरील विषय तज्ज्ञ समितीची बैठक झाली. या बैठकीत फायजरच्या कोरोना लसीवर सविस्तर चर्चा झाली. फायजरने लसीबाबत आणखी माहिती सादर करण्याची गरज बैठकीत तज्ज्ञ समितीने व्यक्त केली होती. त्यानंतर फायजरने आणीबाणीच्या काळासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. भविष्यात लसीबाबत आणखी माहिती लवकरच सादर करू, असे कंपनीने म्हटले आहे. फायजर कंपनीच्या प्रवक्त्याने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
येत्या काळात कंपनी कोरोना लसीबाबत अधिकची माहिती भारतला सादर करेल. तसेच पुन्हा अर्जही दाखल करेल. भारताला कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी फायजर कंपनी कटिबद्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
फायजरची लस टोचल्याने मृत्यू -
फायजर कंपनीने तयार केलेली कोरोना लस टोचल्याने नॉर्वे देशात २३ जणांचा मृत्यू झाला होता. लसीचा डोस घेतल्यानंतर एका दिवसाच्या आत २३ नागरिकांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. लस दिल्यानंतर शरीरावर (साईड इफेक्ट) दुष्परिणाम झाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मृत व्यक्ती वयस्कर असल्याने गंभीर दुष्परीणाम झाल्याचा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला होता. फायजर कंपनीने तयार केलेली लस उणे ७० अंश सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते. त्यामुळे सुलभतेच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने ही लस भारतासाठी व्यवहार्य नसल्याची मत तज्ज्ञांमधून व्यक्त होते होते.