पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी 15 विरोधी पक्षांची बैठक झाली. मात्र या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नाराजी ठळकपणे दिसून आली. अरविंद केजरीवाल यांनी केंद्राने दिल्ली सरकारविरुद्ध आणलेल्या अध्यादेशावर काँग्रेसचा पाठिंबा मागितला होता. मात्र काँग्रेसने अध्यादेशावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यानंतर पत्रकार परिषदेपूर्वीच केजरीवाल दिल्लीला रवाना झाले.
'केजरीवाल नाराज नाहीत': बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव शनिवारी दिल्लीला रवाना झाले. यावेळी पत्रकारांनी तेजस्वी यांना केजरीवाल नाराज का झाले?, असे विचारले. तेव्हा तेजस्वी यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे म्हटले. ते म्हणाले की, 'सर्व चर्चा झाल्या आहेत. इथे कोणीही स्वत:च्या स्वार्थासाठी आले नाही. जनतेच्या मागणीवरून आम्ही एकत्र आलो आहोत.'
'जनतेला मोदींबद्दल बोलायचे नाही': तेजस्वी पुढे म्हणाले की, 'जनतेला नरेंद्र मोदींबद्दल बोलायचे नाही. 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक ही जनतेची निवडणूक असेल. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची निवडणूक नाही. देशवासीयांच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे. देशातील 125 कोटी जनतेसाठी निवडणुका होणार असून त्यांच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या जातील.' तेजस्व म्हणाले की, शुक्रवारच्या बैठकीत सर्वजण उपस्थित होते. सर्वांनी संघटित होऊन फॅसिस्ट शक्तींविरुद्ध एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार केला.
'आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र आलो' : अमित शहांच्या फोटो सेशनच्या क्तव्यावर तेजस्वी यादव म्हणाले की, 'ते लोक असेच करतात. हेच त्या लोकांचे काम आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.' पाटण्यात एकीकडे विरोधी ऐक्याची बैठक सुरू होती. तर दुसरीकडे जम्मूमध्ये एका सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, 'पाटण्यात फोटो सेशन सुरू आहे. त्यांनी (विरोधक) कितीही प्रयत्न केले तरी ते कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत.'
विरोधी पक्षांची पुढील बैठक शिमल्यात : शुक्रवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत पुढील बैठक 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यात घेण्याचा निर्णय झाला आहे. भाजपच्या विरोधात सर्व पक्षांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचे मान्य केले. मात्र, सर्व राज्यांची रणनीती वेगळी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
- Lalu Yadav on Rahul Gandhi : चकाचक दाढी करून बोहल्यावर चढा; लालूंचा राहुल गांधींना भन्नाट सल्ला
- Patna Opposition Meeting : 'तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाही', विरोधकांच्या बैठकीनंतर कोण काय बोललं? जाणून घ्या
- Patna Opposition Meeting: विरोधकांची एकजूट कधीच शक्य नाही, पाटणामध्ये फोटो सेशन आहे - अमित शाह