नूह (हरियाणा) : हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नूह पोलिसांनी फिरोजपूर झिरका येथील काँग्रेस आमदार मामन खान इंजिनियर यांना अटक केली. पोलिसांनी त्यांना गुरुवारी, १४ सप्टेंबर रोजी रात्री राजस्थानमधून अटक केली. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी मामन खान यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप केला होता.
आज न्यायालयात हजर करणार : नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदार मामन खान यांना अटक केल्यानंतर त्यांना आज (शुक्रवार, १५ सप्टेंबर) न्यायालयात हजर करण्यात येईल. त्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. न्यायालयाकडे जाणारा रस्ताही पोलिसांनी पूर्णपणे बंद केलाय. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी बिट्टू बजरंगी आणि मोनू मानेसरला अटक केली होती. मोनू मानेसरला ट्रान्झिट रिमांडवर राजस्थानला नेण्यात आलं आहे. सरकारनं आता नूह हिंसाचाराच्या तपासाला गती दिली असल्यानं, आमदार मामन खान यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगीलाही अटक : ३१ जुलैला हरियाणातील नूह येथे ब्रजमंडल यात्रेदरम्यान दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला होता. हरियाणा एसआयटी या हिंसाचाराचा तपास करत आहे. या प्रकरणी एसआयटी काँग्रेस आमदार मामन खान यांची चौकशी करू इच्छित आहे. यासाठी त्यांना दोन वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र दोन्ही वेळा प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत ते एसआयटीसमोर हजर झाले नव्हते. नूह हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोनू मानेसरला १२ सप्टेंबर रोजी गुरुग्राममधून अटक केली. तो या प्रकरणातील क्रमांक एकचा आरोपी आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुसरा आरोपी बिट्टू बजरंगीलाही अटक केली आहे. पोलिसांनी त्याला १५ ऑगस्टला फरिदाबाद येथून अटक केली होती. तो सध्या जामिनावर आहे.
नूहमध्ये मोठा हिंसाचार झाला होता : ३१ जुलै २०२३ रोजी नूहमध्ये ब्रज मंडळाच्या मिरवणुकीत दोन समुदायांमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात २ होमगार्ड शिपायांसह ६ जणांना जीव गमवावा लागला. तर ६० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हिंसाचारात ५० हून अधिक वाहनं जाळण्यात आली होती.
हेही वाचा :