नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला शेतकरी आंदोलन पंजाब-हरियाणापुरतेच मर्यादित होते. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर आंदोलनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे. अमेरिकन पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलना समर्थनात टि्वट केले. यावर भारतीय विदेश मंत्रालयाने त्यांना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला. याप्रकरणी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी भाजपावर टीका केली.
एकापाठोपाठ एक ट्विट करून अधीर रंजन चौधरी यांनी रिहाना आणि ग्रेटाला पाठिंबा दर्शविला आहे. पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 'या वेळी-ट्रम्प सरकार'( अब की बार ट्रम्प सरकार) असा नारा दिला होता. याचा अर्थ काय होतो. तसेच जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर भारतीयांनीही निषेध व्यक्त केला होता. तेव्हा कुणीही प्रश्न उपस्थित केले नाही. मात्र, जेव्हा ग्रेटा आणि रिहाना यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ टि्वट केले. तर सर्व जण इतके नाराज का झाले आहेत. आपण वैश्विक समाजामध्ये राहत आहोत. कोणावरही टीका करायला घाबण्यापेक्षा आपण आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे चौधरी म्हणाले.
रिहाना आणि ग्रेटा यांचे ट्विट ?
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. या टि्वटमध्ये आंदोलन करणारे शेतकरी दिसत आहेत. रिहानाने 'आपण याबद्दल का बोलत नाही' असा प्रश्न विचारला होता. तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला होता. शेतकरी आंदोलनकर्त्यांसोबत आम्ही एकजूटीने उभे आहोत, असे टि्वट तिने केले होते.