कोलकाता : काँग्रेस आणि डाव्यांमध्ये कोणताही गैरसमज नसल्याचे पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमान बोस यांनी रविवारी स्पष्ट केले. यासोबतच २०२१मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये डावी आघाडी आणि काँग्रेस एकत्र असणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपा आणि तृणमूल धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत..
भाजपा आणि तृणमूल काँग्रेस हे धार्मिक ध्रुवीकरणात गुंतलेले असल्याचा आरोप यावेळी बोस यांनी केला. ते म्हणाले, की हे ध्रुवीकरण रोखण्यासाठीच आम्ही भाजपा आणि तृणमूल विरोधात एकत्र येत ही निवडणूक लढवणार आहोत. आमच्यामध्ये गैरसमज असल्याच्या चर्चा होत होत्या, मात्र तसे काही नसल्याचे ते म्हणाले. तसेच, निवडणुकांच्या जागावाटपाबाबत अद्याप आमची चर्चा झाली नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जानेवारीअखेर पर्यंत जागावाटप निश्चित करण्याचे निर्देश..
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय नेतृत्वाने, राज्य नेतृत्वाला जानेवारी अखेरपर्यंत जागावाटपासंबंधी चर्चा करुन निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. जागावाटप झाल्यानंतर हे दोन्ही पक्ष लवकरात लवकर उमेदवारांची निवड आणि पुढील योजना करु शकतील. काँग्रेसने डाव्या आघाडीसोबत याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळही नेमले आहे.
हेही वाचा : कृषी कायद्यांच्या माहितीची याचिका फेटाळल्याबाबत चिदंबरम नाराज; नीती आयोगावर साधला निशाणा