मुझफ्फरपूर (बिहार) Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ कमी होत नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विधानाचा तीव्र निषेध केला. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं असून, नितीश कुमार यांच्याविरोधात मुझफ्फरपूरच्या सीजेएम कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नितीश कुमार यांच्या विरोधात तक्रार : नितीश कुमार यांच्यावर ३५४ डी, ५०४, ५०५, ५०९ आयपीसी आणि ६७ आयटी कायद्यान्वये तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी २५ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मुला-मुलींच्या संदर्भात सभागृहात भाष्य केलं होतं. आम्ही याच संदर्भात हा खटला दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अपमानास्पद आणि अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले. नितीश कुमार यांनी असे शब्द वापरले जे आपण कुठेही सांगू शकत नाही. हे प्रकरण ग्राह्य धरण्यात आलं असून २५ नोव्हेंबर ही सुनावणीची तारीख आहे. - अनिल कुमार सिंह, वकील आणि तक्रारदार
नितीश कुमार काय म्हणाले होते : मंगळवारी (७ नोव्हेंबर) नितीश कुमार सभागृहात जातीय जनगणनेवर आपली भूमिका मांडत होते. यावेळी त्यांनी बिहारची लोकसंख्या कशी नियंत्रित केली आहे, हे सांगितलं. या दरम्यान त्यांनी दिलेलं वक्तव्य शारीरिक संबंधाशी संबंधित होतं. जेव्हा नितीश सभागृहात निवेदन देत होते, तेव्हा तेथे अनेक महिला सदस्यही उपस्थित होत्या.
भाजपा राजीनाम्याच्या मागणीवर ठाम : नितीश कुमारांच्या आक्षेपार्ह विधानानं देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत भाजपा आक्रमक असून नितीश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. त्याचवेळी राष्ट्रीय महिला आयोगानंही या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत नितीश कुमार यांना माफी मागण्यास सांगितलं होतं.
नितीश कुमारांनी माफी मागितली : मंगळवारी सभागृहात दिलेल्या वक्तव्यावर नितीश कुमार यांनी बुधवारी माफी मागितली. नितीश कुमार म्हणाले की, 'माझ्या वक्तव्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल तर मी हात जोडून माफी मागतो. कोणाला दुखावण्यासाठी मी हे विधान केलेलं नाही. मी माझं विधान मागे घेतो. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता', असं ते म्हणाले.
हेही वाचा :
- Narendra Modi : 'नितीश कुमारांना काही लाज वाटत नाही', लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून मोदींचा हल्लाबोल
- CM Nitish Kumar Apologized : मुख्यमंत्री नितिश कुमारांचा 'त्या' वक्तव्यावरुन माफीनामा, पहा काय म्हणाले?
- Nitish Kumar : भर विधानसभेत नितीश कुमारांचं लज्जास्पद विधान; लोकसंख्या नियंत्रणाचा दिला फॉर्म्युला