लखनऊ - मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केल्यामुळे एका कुटुंबाला धमकीचे फोन येऊ लागल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. चार दिवसांपूर्वी कासिम खान या व्यक्तीने धर्मांतर केल्यानंतर त्याला निनावी नंबरवरून धमकीचे फोन येऊ लागले आहेत. घाबरलेल्या कुटुंबाने आता पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
हिंदू धर्माने प्रभावित झाल्याने धर्मांतर -
कासिम खान नामक व्यक्तीने आठ वर्षांपूर्वी अनिता या हिंदू मुलीशी विवाह केला होता. दोघेही आपआपल्या धर्माचे पालन करून राहत होते. मात्र, हिंदू धर्मातील प्रथा परंपरा पाहून कासिम प्रभावित झाल्याने त्याने हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. स्वत:च्या इच्छेने त्याने धर्मांतर केले. कासिमने करमवीर सिंह असे हिंदू नावही स्वीकारले. कासिमने धर्मांतर केल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर त्यांला धमकीचे फोन सुरू झाले.
जीवे मारण्याची धमकी -
पीडित कुटुंबीय अलीगढमधील झलकारिया नगर परिसरातील दिल्ली गेट येथे वास्तव्यास होते. मात्र, धमकीचे फोन आल्यानंतर त्याने भीतीपोटी घरही बदलले. या कुटुंबाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली असून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकीचे फोन येत असल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.