नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून ( Monsoon Session Begin Today ) सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशासाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. हा काळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आहे. आगामी 15 ऑगस्ट आणि त्यापुढील 25 वर्षांचे विशेष महत्त्व आहे. कारण आता देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे तर 25 वर्षांनी देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा आपला प्रवास आणि आपण ज्या नवीन उंची गाठू, ते ठरवण्याचा संकल्प करण्याची वेळ आलेली आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवड - या अधिवेशना दरम्यान देशाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे. आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. देशभरातील विधिमंडळात यासाठी मतदान होत आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे दोन्ही पदांसाठी याच अधिवेशनाच्या कालावधीत निवडणूक होत आहे.
अधिवेशन वादळी ठरणार - या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त कामकाज व्हावे या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार 24 विधेयके सादर करण्याची शक्यता आहे. यातील काही विधेयकांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरतील अशी शक्यता आहे.
हेही वाचा - Vice President Election 2022: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेचा यूपीएला पाठिंबा