नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (इंडिया) च्या घटक पक्षांचे खासदार काळे कपडे परिधान करून संसदेत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत संसदेत मणिपूरच्या मुद्द्यावर निवेदन न केल्यामुळे इंडियाचे सर्व खासदार काळे कपडे घालून संसदेत दाखल झाले आहेत.
लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव : मणिपूर हिंसाचारावर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गदारोळ केला आहे. मात्र त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर संसदेत निवेदन केले नाही. त्यामुळे काँग्रेसने बुधवारी लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. लोकसभेच्या सभापतींनी या प्रस्तावाला चर्चेसाठी मंजुरीही दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरवणार आहेत.
लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ : बुधवारी मणिपूरच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी मणिपूर हिंसाचरावरुन विरोध सुरू केला. या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले. मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधक सातत्याने पंतप्रधानांना सभागृहातच निवेदन देण्याची मागणी करत आहेत.
काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यांना व्हीप जारी : काँग्रेसने आपल्या राज्यसभा सदस्यांना व्हीप जारी करून गुरुवारी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार दिल्लीशी संबंधित केंद्रीय अध्यादेश बदलण्यासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काँग्रेसने बुधवारी आपल्या राज्यसभेच्या सदस्यांना व्हीप जारी केल्याची चर्चा आहे. काँग्रेस खासदारांना गुरुवारी दिवसभर सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी घेतले जाणार असल्याची माहिती या खासदारांना देण्यात आली आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य व्हीप जयराम रमेश यांनी जारी केलेल्या व्हीपमध्ये 27 जुलैला सकाळी 11 वाजेपासून कामकाज तहकूब होईपर्यंत काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहून पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -