नवी दिल्ली : आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी विशेष सूचना केल्या आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टीकच्या ध्वजाचा वापर केला जाऊ नये याकडे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लक्ष द्यावे अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केल्या आहे.
गृहमंत्रालयाचे राज्यांना परिपत्रक
केंद्रीय गृहमंत्रालयाने यासाठीचे परिपत्रक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविले आहे. राष्ट्रध्वज हे देशातील जनतेच्या आशा, आकांक्षाचे प्रतिक आहे आणि त्याचा मान ठेवला पाहिजे. राष्ट्रध्वजाविषयी सर्वांना अभिमान आणि गर्व आहे. मात्र राष्ट्रध्वजाविषयीचे नियम आणि कायद्यांविषयी नागरिक, संस्थांमध्ये माहितीचा अभाव असल्याचे दिसून आले आहे.
प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजामुळे सन्मानाची समस्या उद्भवते
महत्वाच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडा समारंभांदरम्यान कागदाऐवजी प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. मात्र प्लास्टीकचे दीर्घ कालावधीतही विघटन होत नसल्याने यामुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची समस्या उद्भवते.
कागदी राष्ट्रध्वज वापरावा
त्यामुळे महत्वाच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि क्रीडा समारंभांदरम्यान फ्लॅग कोड ऑफ इंडियानुसार नागरिकांनी कागदाच्या राष्ट्रध्वाजाचा वापर करावा याकडे आपण लक्ष द्यावे. तसेच कार्यक्रमानंतर कुणीही हे राष्ट्रध्वज जमीनीवर फेकू नये हे सुनिश्चित करावे अशा सूचना गृहमंत्रालयाने केल्या आहे. अशा राष्ट्रध्वजांची सन्मानाने खासगीत किंवा वैयक्तिक रितीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे अशा सूचना यातून करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये NIA ची मोठी कारवाई, 40 हून अधिक ठिकाणी छापे