हसन (कर्नाटक) : कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील एका गावात एका तरुणाने चक्क त्याच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्यालाच जेरबंद केले आहे. बिबट्याशी झुंज देणाऱ्या या तरुणाने आधी बिबट्याला जिवंत पकडले आणि नंतर त्याला दुचाकीला बांधून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. मुथू असे या साहसी तरुणाचे नाव आहे. तो बागीवालू गावातील रहिवासी आहे.
बिबट्याला दुचाकीला बांधून गावात आणले : 14 जुलै रोजी मुथू आपल्या शेतात औषध फवारण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. मुथू शेतात जात असताना झाडावर बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्याने बिबट्याशी झुंज देत, त्याचे पाय दोरीने बांधले आणि त्याच्या शेतातून दुचाकीला बांधून गावात आणले. त्यानंतर मुथूने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
तरुण आणि बिबट्या दोघेही जखमी : घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी बिबट्यावर उपचार करून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर जखमी मुथूला उपचारासाठी शासकीय जयचामराजेंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या तेथे उपचार सुरू आहेत. यावेळी वनाधिकारी हेमंत कुमार, उप वनाधिकारी रमेश जी.एच., वनरक्षक अरुण कुमार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
गायीने आणि कुत्र्याने मिळून मालकाचे प्राण वाचवले : अलीकडेच, कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात एक दुर्मिळ घटना घडली. येथे एका गायीने आणि कुत्र्याने मिळून त्यांच्या मालकाचे प्राण वाचवले. कोडाटिकरे गावातील करीहलप्पा (58) या शेतकऱ्यावर एका बिबट्याने अचानक हल्ला केला होता. त्यावेळी सोबत असलेल्या गायीने करीहलप्पा यांना धक्का देऊन बाजूला केले. त्या पाठोपाठ कुत्र्यानेही बिबट्यावर उडी मारून त्याचा पाठलाग केला. त्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. अशाप्रकारे करीहलप्पा बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले. या घटनेनंतर शेतकरी करिहलप्पा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा बिबट्या माझ्यासमोर येऊन उभा राहिला, तेव्हा माझा जीव जवळजवळ संपलाच होता. पण माझ्या गायीने आणि कुत्र्याने मिळून माझा जीव वाचवला. - करिहलप्पा, शेतकरी
हे ही वाचा :
- Cheetah Died : मोदींनी आणलेल्या चित्त्यांना भारतीय वातावरण मानवेना? भारतात आणलेल्या 20 पैकी 8 चित्त्यांचा मृत्यू
- Leopard Attack News: राखणदारी करणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, मालकाने धाव घेतली अन्... पहा व्हिडिओ
- Leopard Attack In Nashik: बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षांची बालिका ठार; बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी