मुंबई - गुणरत्न सदावर्ते त्याच्याच कर्माची फळे भोगत तुरुंगात पडला आहे. अनेक जिल्ह्यांत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने या महाशयांची गावभर वरात काढली जात असल्याचे चित्र दिसत आहे. एक मात्र नक्की, सदावर्तेची वरात निघाल्यापासून एस.टी. वेगात सुरू झाली आहे व आतापर्यंत 75 हजार एस.टी. कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. ( Today Saamana Editorial On Sadavarte ) सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर एस.टी. संप इतका चिघळला नसता असे म्हणत सदावर्तेवर चांगलाच प्रहार आजच्या सामनाच्या अग्रलेखातू करण्यात आला आहे.
वकिलीतून इतका पैसा - गुणरत्न सदावर्तेच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत. सदावर्ते व त्याच्या माफिया टोळीने एस.टी. कामगारांकडून कोट्यावधी रुपये गोळा केले. कामगारांना देशोधडीस लावून स्वतःचे खिसे भरणारे सदावर्तेसारखे पुढारी म्हणजे माणुसकीचे शत्रूच आहेत. आता पोलिसांनी सदावर्तेच्या घरातून पैसे मोजण्याची मशीन जप्त केली आहे. पैसे मोजण्याची मशीन घरात ठेवावी असा कोणता धंदा या महाशयांनी सुरू केला होता? वकिलीतून इतका पैसा मिळावा की, ते मोजायला यंत्र लागावे? असा प्रश्न यामध्ये उपस्थित केला आहे.
'ऍट्रॉसिटी' गान्ह्यात अडकवू अशी भीती दाखवत होते - एस.टी. कामगारांना उल्लू बनवून जमा केलेल्या पैशांची मोजदाद करायला ही मशीन सदावर्तेकडे होती. सदावर्तेने संपकाळात काही मोठ्या मालमत्ता खरेदी केल्या. सदावर्ते ज्या परळ भागातील इमारतीत राहत होता ती जागादेखील संशयास्पद व्यवहारातून, बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सदावर्ते व त्याची बायको हे इमारतीमधील इतर अधिकृत रहिवाशांना सतत धमक्या देत होते. दरम्यना, कोणी प्रतिवाद केला तर 'ऍट्रॉसिटी' गान्ह्यात अडकवू अशी भीती दाखवत होते अशी माहिती पुढे करत सामनाने चांगली हजेरी घेतली आहे.
अप्रत्यक्ष भाजपला टोला - सदावर्तेला श्री. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याची दुर्बुद्धी आठवली नसती तर हातात कायद्याचे पुस्तक घेऊन या माणसाने सामान्यांचा छळवाद सुरूच ठेवला असता. सदावर्तेने परिसरातील अनेकांचे जिणे हरामच केले होते. त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या डॉ. प्रियंका शेट्ये या सदावर्तेच्या बायकोस जाब विचारायला गेल्या तेव्हा डॉ. प्रियंकावर हल्ला करण्यात आला व पोलीस त्याबाबत गप्प राहिले. सदावर्तेने ही जी दादागिरी सुरूच ठेवली, त्याचे बोलवते धनी नागपूर आणि सांगलीत असल्याचे उघड झाले आहे असा आरोप करत अप्रत्यक्ष भाजपला टोला यामध्ये लगावला आहे.
लाखभर एस.टी. कर्मचाऱ्यांचे शोषण केले - सांगलीतील मंगळसूत्र चोरांची टोळी व सदावर्ते टोळीची युती झाली आणि त्यांना नागपूरचा अज्ञात आशीर्वाद लाभला असल्याचा रिपोर्ट आहे. सदावर्तेसारख्या लोकांना हाताशी धरून कष्टकरी वर्गात असंतोष निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. पाच वर्षे राज्य चालवणाऱ्यांना हे शहाणपण नसावे हे वेदनादायी आहे. सदावर्ते याच्या घरात फक्त नोटा मोजण्याची मशीनच सापडली नाही, तर त्याने एक गाढवही पाळले आहे. गाढव पाळणे हे काही बेकायदेशीर नाही, पण यामुळे सदावर्ते व त्याच्या कुटुंबाच्या 'छंद', आवडी-निवडीची कल्पना यावी. अशा व्यक्तीने लाखभर एस.टी. कर्मचाऱ्यांचे शोषण केले, त्यांना रस्त्यावर आणले असा थेट आरोप सदावर्तेवर करण्यात आला आहे.
न्यायालयातून त्या न्यायालयात - सरकारबरोबरच ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरले. त्याचे ते जाहीर सभांतले नाचकाम, चित्रविचित्र वागणे, बोलणे यामुळे अनेकांना शिसारी आली असेल, पण करायचं काय? हा प्रश्नच होता. हातात कायद्याचे पुस्तक नाचवत, अंगावर वकिलीचा काळा डगला चढवून या महाशयांनी राज्यात जो खेळ चालवला होता तो शेवटी कायद्यानेच संपवला आहे. सदावर्ते याच्या आतंकवादी वागण्याने शंभरावर एस.टी. कर्मचाऱ्यांंना कायमचे नोकरीस मुकावे लागले. या कर्मचाऱ्यांची कुटुंबे आता सदावर्ते पोसणार आहे काय? नेतृत्व संयमी नसले की, कामगारांची व जनतेची काय ससेहोलपट होते हे सदावर्ते प्रकरणात दिसले. 'डंके की चोट पर' हा गुणरत्न सदावर्तेचा परवलीचा शब्द होता. आज सदावर्तेची वरात या न्यायालयातून त्या न्यायालयात, या पोलीस स्टेशनातून त्या पोलीस स्टेशनात सुरू आहे.
गाढव तुरुंगात जाताच 'लाल परी' मुक्त - सदावर्तेला गाढवांची आवड होती. त्याने गाढव पाळले, पण या महान गाढवप्रेमींना कोण पाळत होते हेसुद्धा लोकांसमोर यायलाच हवे. सदावर्ते जेलातून, पोलीस स्टेशनातून बाहेर येताना उदयनराजेंप्रमाणे 'कॉलर' उडवताना दिसतो व 'भारतमाता की जय' अशी विजयाची खूण दाखवत गर्जना करतो. हा विनोदच आहे. कायदा हा सामान्यांची कवचकुंडले असतो. सदावर्तेसारखे लोक कायदा आणि संविधानाचा गैरवापर करतात व सामान्यांना देशोधडीस लावतात. ''कायदा गाढव असतो'' अशा अर्थाची एक म्हण आहे. सदावर्तेसारखे लोक गाढवच आपल्या दारात बांधतात व मुक्या मेंढरासारखी जनता त्या गाढवाची पूजा करते. गाढव तुरुंगात जाताच 'लाल परी' मुक्त झाली, गावागावांत धावू लागली असा विश्वास यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - British PM Visits India : ब्रिटनचे पंतप्रधान भारत भेटीवर; गुजरातमधून दौऱ्याची सुरुवात